औरंगाबाद – शहरातील विकास कामांचे स्थायी समिती सदस्यांना किती गांभीर्य आहे हे आज (ता. १५) पुन्हा एकदा पाहायला मिळाले. १६ सदस्य असलेल्या स्थायी समितीच्या बैठकीला तब्बल ६ सदस्य गैरहजर होते. काही लेटलतीफ नगरसेवक सभा सुरु झाल्यानंतर उशिराने हजर झाले आणि आपली हजेरी लावून बैठकीतून काढता पाय घेतला. या बैठकीत कचरा व्यवस्थापनाबाबत झालेल्या चर्चेवेळी नियुक्त संस्थेच्या प्रतिनिधींनी केलेली भाषणबाजी चर्चेचा विषय ठरली. या प्रतिनिधींनी स्वतःच्या संस्थेचेच गोडवे गाण्यास सुरुवात केल्यानंतर गजानन बारवाल यांनी, सभा महापालिकेतील प्रश्नांबाबत आहे, तुमच्या संस्थेच्या कामाची नाही, असे तिथेच सुनावले.
महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती राजू
वैद्य यांनी शनिवारी सकाळी ११:३० बैठक बोलावली होती. मात्र शहरातील विकास कामाचे
गांभीर्य नसलेले स्थायी समितीचे सहा सदस्य या बैठकीला गैरहजर होते. काही लेटलतीफ
नगरसेवक सभा सुरू झाल्यानंतर उशिराने फक्त नावापुरते हजर झाले. काहींनी तर हजेरी
लावून सभेतून काढता पाय घेतला होता.
शहरात कचरा, पाणी,
रस्ते हे विषय
गंभीर असताना विविध वॉर्डाचे प्रतिनिधित्व करणारे स्थायी
सभेचे सदस्यांनी या सभेला दांडी मारली. कोरम पूर्ण होत असल्यामुळे सभेचे कामकाज
सुरु झाले, मात्र सदस्यांची शहराच्या समस्यांबाबतची अनास्था चर्चेचा विषय ठरली. स्थायी
सभेत आज शहरातील कचऱ्यावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. त्यामध्ये ओला व सुका
कचऱ्याचे वर्गीकरण तसेच त्याविषयी नागरिकांमध्ये करण्यात येणाऱ्या जनजागृती बाबत अधिकाऱ्यांच्या
वतीने खुलासा करण्यात आला. प्रशासकीय अधिकाऱ्याने कचऱ्यावर जोरदार भाषणबाजी करून
काही वेळ सभेला जाहीर सभेचे स्वरूप आणले. यावेळी स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी
परितोष पाठक आणि गजानन घुले यांनी आपल्या संस्थेने शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी कसे
काम केले याचेच वर्णन करण्यास सुरुवात केली. त्यांची गौरवगाथा मध्येच थांबवत माजी
सभापती आणि स्थायी समिती सदस्य गजानन बारवाल यांनी तुमच्या संस्थेच्या कामाचे
गुणगाण एकण्यासाठी ही सभा नाही, असे सुनावले. शहरात कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे,
त्यावर मुद्देसुद बोलण्याचे बारवाल यांनी त्यांना सुनावले.
सहा सदस्य गैरहजर
शहरात जिकडे तिकडे कचरा साचलेला आहे. थंडी
वाढत आहे. यामुळे साथ रोग पसरण्याची शक्यता आहे. या गंभीर विषयावर आयोजित सभेसाठी
स्थायी समितीच्या १६ पैकी ६ सदस्यांनी आज दांडी मारली. जे सदस्य उपस्थित होते,
त्यांचेही सभेत लक्ष असल्याचे दिसले नाही. फक्त हजेरी लावून निघून जाण्यातच
काहींनी धन्यता मानली. यामुळे शहराच्या प्रश्नांकडे हे नगरसेवक किती गांभीर्याने
पाहातात, याची चर्चा महापालिकेत रंगली.
आमदार पुत्रांनीही मारली दांडी
औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय
शिरसाठ यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट हे वॉर्ड क्रमांक १०४ बन्सीलालनागरचे प्रतिनिधित्व
करतात. रेल्वेस्टेशन परिसर तसेच बन्सीलालनगर या परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य
पसरलेले आहे. मात्र तरीही आमदार पुत्रांना याबाबत काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून
येते. स्थायी समितीमध्ये उपस्थित राहून आपल्या महत्त्वाच्या विषयांवर गांभीर्याने
चर्चा करुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांना आज वेळ मिळाला नाही, हे विशेष.












